Vidarbh News,Ajay : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने १ जुलै २०२६ रोजी वणीत भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाची माहिती देण्यासाठी वसंत जिनिंग हॉल, वणी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. ही पत्रकार परिषद वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय निखाडे यांनी शासन व प्रशासनाकडून शेतकरी, महिला, युवक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. फसवी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील त्रुटी, अपुरा वीजपुरवठा, पिक विमा, खत वितरण, वाढते इंधन दर, रखडलेले घरकुल हप्ते, पाणीपुरवठा, अमृत योजना, जलजीवन मिशन तसेच स्थानिक युवकांना रोजगार न मिळणे यासह अनेक प्रश्नांवर शासन अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय उड्डाणपूल बांधकामांमुळे निर्माण झालेल्या समस्या, प्रदूषण, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न, ओव्हरलोड कोळसा वाहतूक, स्मार्ट मीटर सक्ती, वन्यप्राण्यांचे हल्ले तसेच नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबतही पक्षाने नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रश्नांवर जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी १ जुलै रोजी वणीत मोठ्या संख्येने नागरिकांनी जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आले.