अखेर १३ व्या दिवशी साथ सोडली...पत्रकार प्रवीण शर्मा यांची अखेरची एक्झिट...
Desk By - Vidharbh News
Ajay Wani:- शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक मुक्त ललकारचे संपादक प्रवीण दिवानचंद शर्मा (वय ४८) यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. १३ जून रोजी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र मेंदूला झालेल्या गंभीर इजेमुळे आणि रक्तपुरवठा बाधित झाल्याने अखेर १३ दिवसांच्या मृत्यूशी सुरू असलेल्या संघर्षानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रवीण शर्मा हे केवळ पत्रकार नव्हते, तर सर्वांशी आपुलकीने वागणारे, हसतमुख स्वभावाने माणसे जोडणारे व्यक्तिमत्त्व होते. वणीतील पत्रकार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून, अनेकांनी एका मनमिळावू सहकाऱ्याला गमावल्याची भावना व्यक्त केली.
त्यांच्या अकाली निधनाने वणीच्या पत्रकारितेतील एक संवेदनशील, अभ्यासू आणि जिव्हाळ्याचा आवाज कायमचा शांत झाला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि पत्रकारितेतील योगदान सहकाऱ्यांच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या पार्थिवावर शनिवार रोजी वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.