वणी : वणी तालुक्यातील लाईमस्टोन खदानीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविला जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आरोग्य सभापती व रुग्णसेवा अध्यक्ष  धनंजय त्रिंबके यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल), वणी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

धनंजय त्रिंबके यांनी निवेदनात म्हटले आहे की, संबंधित लाईमस्टोन खदानीत मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून, उत्खननातून निघणारे 'ओव्हर बर्डन'देखील नियमबाह्य पद्धतीने विकले जात आहे. तसेच खदानीतून निघणारे गौण खनिज राजूर येथील फारुक लाईम परिसरात नेऊन कोणतीही अधिकृत परवानगी नसताना त्याची साठवणूक व विक्री होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, प्रत्यक्ष उत्खनन, वाहतूक आणि शासनाकडे जमा होणारी रॉयल्टी यामध्ये मोठी तफावत असून, रॉयल्टी पासचा गैरवापर करून शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची महसूल व खनिकर्म विभागामार्फत संयुक्त पाहणी करून मागील एका वर्षातील उत्खनन परवाने, रॉयल्टी चलने, वाहतूक परवाने आणि प्रत्यक्ष साठ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, राजूर येथील कथित अवैध साठवणूक केंद्रावर अचानक धाड टाकून तेथील साठ्याची कायदेशीर वैधता तपासावी, अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम, २०१३ आणि इतर लागू कायद्यांनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, निवेदनातील आरोप हे मनसेचे रुग्णसेवा अध्यक्ष धनंजय त्रिंबके यांनी केलेले आरोप असून, त्याबाबत संबंधित प्रशासन अथवा खदान व्यवस्थापनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.