Vidarbh News AJAY,Wani:- शहरात एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा वाढता शिरकाव रोखण्यासाठी वणी पोलीस अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नवीन P.I भानुदास पिदुरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अमली पदार्थांच्या विशेषतः एमडीच्या विक्री व तस्करीकडे बारकाईने लक्ष दिले जात असून, त्याचे परिणाम आता प्रत्यक्ष कारवायांमधून दिसू लागले आहेत. 19 जून रोजी रात्री गणेशपूर रोड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (वय 28, रा. तेलीफैल, वणी) याला 19.27 ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली. आरोपीकडून 1 लाख 34 हजार 890 रुपयांचा अमली पदार्थ आणि 15 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईनंतर पोलिसांनी केवळ जप्तीवर न थांबता एमडीच्या पुरवठा साखळीचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान सदर अमली पदार्थ प्रज्ज्वल उर्फ ‘काॅकरोच’ महेश उपरे (वय 27, रा. तेलीफैल, वणी) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात एमडीची वाढती विक्री आणि त्याचा तरुणांवर होणारा परिणाम लक्षात घेता वणी पोलिसांनी या प्रकारच्या गुन्ह्यांना प्राधान्यक्रमावर ठेवले असून, संबंधितांवर सातत्याने कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, यापूर्वी दाखल झालेल्या एमडी विक्री प्रकरणात सहभागी असलेल्या प्रज्ज्वल महेश उपरे, अविनाश विजय पाटील आणि रविंद्र धनराज गुप्ता या तीन आरोपींनाही वणी पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI साजिद सय्यद, PSI सुयोग महापुरे, मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पोपुलवार, गणेश मेश्राम, अरविंद बुच्चे, मिथुन, श्याम राठोड आणि निलेश आडे यांनी ही कारवाई पार पाडली.