Ajay Wani : तालुक्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या भांदेवाडा खाणीत अज्ञात चोरट्यांनी हात साफ करत विद्युत केबल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे खाण व्यवस्थापनात खळबळ उडाली असून प्रकरण वणी ठाण्यात पोहोचले.

माहितीनुसार, खाण परिसरातील सब-स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला एस.डी.एल. यंत्रासाठी वापरला जाणारा  फ्लेक्सिबल विद्युत केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नियमित पाहणीदरम्यान ही बाब निदर्शनास आल्यानंतर खाण प्रशासनाने परिसरात शोध घेतला. मात्र, चोरीस गेलेल्या केबलचा कोणताही मागमूस लागला नाही.

या केबलची किंमत अंदाजे ३८ हजारावर असल्याचे सांगण्यात आले. अखेर खाण व्यवस्थापक सुरज शाहू  वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली असून आरोपींचा शोध सुरू आहे.