अजय वणी :- वाढदिवस केवळ शुभेच्छांचा नाही, तर समाजसेवेचा उत्सव ठरावा, या उद्देशाने शिवसेना नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, सोमवार (२९ जून) रोजी वणीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला हा उपक्रम हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. जनसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याचा विजय चोरडिया यांचा हा प्रयत्न आहे.

जैताई मंदिर परिसरात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग व त्वचारोग तज्ज्ञांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन तसेच नेत्र तपासणीनंतर मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचा वणी, मारेगाव, झरी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शुभम गोरे (७९७२२८४२३८) व राहुल पारखी (९१६९४६१६१६) यांच्याशी संपर्क साधावा.