Vidarbh News,AJAY Wani : नीट (NEET-UG) परीक्षेतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील वाढत्या अनियमितता, विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या आत्महत्यांच्या घटना, तसेच वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचे होत असलेले खाजगीकरण या गंभीर प्रश्नांविरोधात वणीत युवक व विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन करून संताप व्यक्त केला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शनिवारी टिळक चौक येथे युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, AISF तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांची तयारी करणारे अनेक युवक-युवती सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे तरुणांमध्ये मोठी नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले. केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रातील गोंधळ तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. युवकांच्या भवितव्याशी होणारा खेळ थांबला नाही तर वणीसह संपूर्ण परिसरात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.